राजकीय वर्तुळात मोठी खळबळ
मुंबई : नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी असल्यासारखे वागत असल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या सदिच्छा भेटीने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
निवडणूक काळातील आरोप – प्रत्यारोप, टोकाची भूमिका आणि उघड मतभेद लक्षात घेता ही भेट अत्यंत अनपेक्षित मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, आरोपांवर पडदा पडला का, की पक्षातील अंतर्गत समीकरणांमध्ये मोठा बदल होणार आहे, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ही केवळ औपचारिक सदिच्छा भेट आहे की भविष्यातील राजकीय समेटाचा संकेत, याबाबत दोन्ही नेत्यांकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेली नाही. मात्र आरोपांनंतर थेट भेट झाल्याने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे.