कणकवलीत राजकीय वातावरण तापण्याची शक्यता.?
कणकवली :
नगरपंचायत निवडणूक निकालानंतर कणकवली शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले अभिनंदनाचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत. मात्र यातील एक बॅनर सध्या विशेष लक्ष वेधून घेत आहे. शहरातील श्रीधर नाईक चौकात लावण्यात आलेल्या बॅनरवर “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या… #नाईक हितचिंतक” असा आशय नमूद करण्यात आला असून, या मजकुरामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सदर बॅनरवर कोणाचेही नाव किंवा पक्षाचा उल्लेख नसला तरी त्यातील सूचक शब्दरचना पाहता राजकीय टोला असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. निवडणूक निकालानंतरच्या वातावरणात अशा प्रकारचे बॅनर लागल्याने शहरातील राजकीय तापमान वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, या बॅनरबाबत संबंधितांकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, सोशल मीडियासह शहरात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू असून पुढील राजकीय घडामोडींवर याचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.