गोपुरी आश्रमात सामाजिक कार्यकर्त्यांच्या बैठकीतील निर्णय
कस्तुरी पाताडे हिला वाहण्यात आली श्रद्धांजली
कणकवली : कासार्डे येथील कस्तुरी पाताडे या युवतीचा मृत्यू आणि त्यानंतर झालेली घटना दुर्दैवी आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम असणे गरजेचे आहे. जर शासकीय रुग्णालये सुसज्ज असती, तर एका छोट्या शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयात जाण्याची वेळ आली नसती. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील आरोग्य प्रश्नी येत्या २० डिसेंबर रोजी पालकमंत्री नीतेश राणे यांची भेट घेऊन चर्चा करण्याचा निर्णय कणकवली येथील गोपुरी आश्रमात आयोजित बैठकीत घेण्यात आला.
कणकवली गोपुरी आश्रम येथील गणपतराव सावंत बहुद्देशीय सभागृहात जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीच्या सुरुवातीलाच मृत कस्तुरी चंद्रकांत पाताडे हिला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या बैठकीला ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबळेकर, गोपुरीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर, सचिव विनायक मेस्त्री, नंदन वेंगुर्लेकर, विजय सावंत, संदीप सावंत, विनायक सापळे, मधुकर नलावडे, प्रमोद जोशी, विनायक नाईक, प्रसाद सावंत, यशोधर खाडये, संजय गोरुले, नितीन तळेकर, शंकर घुरी, संदीप शिंदे, राजेंद्र वर्णे, किशोर सोगम, सुप्रिया पाटील, गीतांजली कामत, राहुल कदम, नामानंद मोडक, धनंजय सावंत, दुर्गाप्रसाद काजरेकर, परेश परुळेकर, संतोष माळवदे, दीपक कदम, विश्वजीत रासम, रमाकांत पावसकर, पत्रकार भगवान लोके, उमेश बुचडे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
अशोक करंबळेकर म्हणाले, शासकीय रुग्णालयांमध्ये यंत्रणा असली तरी ती चालविण्यासाठी तज्ज्ञ उपलब्ध नसतात. कधी कर्मचारी असून यंत्रणा नसते. या विसंगतीमुळे गरीब रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागते. १६ डिसेंबरला खासगी सेवा बंद असताना शासकीय रुग्णालयावर जो ताण आला, त्यातून या व्यवस्थेचे अपयश अधोरेखित झाले आहे. आरोग्य व्यवस्थेचा हा गोंधळ थांबविण्यासाठी आम्ही पालकमंत्र्यांकडे नागरिकांच्या भावना मांडणार आहोत. तसेच जिल्ह्याच्या आरोग्य प्रश्नांवर आरोग्यमंत्र्यांसोबत जिल्ह्यातच बैठक आयोजित करण्याची विनंती पालकमंत्र्यांना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विनायक मेस्त्री म्हणाले, कणकवलीत झालेला उद्रेक हा चिथावणीमुळे झाला. जनतेचा तो आक्रोश होता. कस्तुरीची शस्त्रक्रिया साधी होती. मात्र, ती येथील शासकीय रुग्णालयात होत नव्हती. म्हणून कुटुंबियांना खासगी रुग्णालयात जावे लागले. म्हणून आज आपण इथे जमलोय. यापुढे ‘साथी’ या संस्थेच्या मदतीने सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी लढा दिला जाईल…
नंदन वेंगुर्लेकर म्हणाले, आपण स्वतः शासकीय रुग्णालयांना भेटी देऊन तेथील त्रुटी शोधल्या पाहिजेत. जिल्ह्याच्या समस्या मांडून आरोग्यमंत्री आणि संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
डॉ. राजेंद्र मुंबरकर म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णांना जमिनी विकून किंवा कर्ज काढून उपचार करावे लागतात, ही खेदजनक बाब आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये उत्तम सेवा मिळावी, यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
संजय गोरुले म्हणाले, वर्षानुवर्षे जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था सुधारलेली नाही. आजही आम्हाला गोवा किंवा कोल्हापूरवर अवलंबून राहावे लागते. गोव्याच्या रुग्णालयात मिळणारी वागणुकही अपमानजनक असते. त्यामुळे आपली यंत्रणाच सक्षम व्हायला हवी.
व्ही. के. सावंत यांनीही या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे सक्षम करण्यात यावीत, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना खासगी रुग्णालयांकडे जावे लागणार नाही. ही मुख्य मागणी पालकमंत्र्यांकडे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.