कणकवली : कणकवली नगर वाचनालयातर्फे प्रतिवर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी संस्कृत व्याकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा रविवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी ८:३० ते १२:३० या वेळेत नगर वाचनालयाच्या अप्पासाहेब पटवर्धन सभागृहात होणार आहे.
या कार्यशाळेसाठी पुणे येथील प्रख्यात संस्कृत शिक्षिका आरती विनय पवार मार्गदर्शन करणार असून ही कार्यशाळा संस्कृत (संपूर्ण) अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. संस्कृत भाषेत व्याकरणाला विशेष महत्त्व असून विद्यार्थ्यांचा व्याकरणाचा पाया भक्कम व्हावा, तसेच परीक्षेत पैकीच्या पैकी गुण कसे मिळवता येतील याबाबतच्या उपयुक्त क्लुप्त्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश आहे.
यासोबतच बदललेल्या स्वरूपातील संस्कृत प्रश्नपत्रिका वेळेचे योग्य नियोजन करून कशी लिहावी, याविषयीही सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशी एक मार्गदर्शिका प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहे.
सभागृहाची आसन क्षमता फक्त २०० विद्यार्थ्यांपुरती मर्यादित असल्याने ‘प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्रवेश’ या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार आहे.
मागील काही वर्षांतील कार्यशाळेला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीही हे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेचे शुल्क रु. ५०/- इतके ठेवण्यात आले आहे.
नोंदणीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी ग्रंथपाल राजन ठाकूर (मो. ९०७५८७८९८७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर वाचनालयाचे अध्यक्ष मा. आम. नितेशजी राणेसाहेब व कार्यवाह महंमद हनीफ आदम पीरखान यांनी केले आहे.
विशेष सूचना :
आपल्या शाळेतील संस्कृत शिक्षकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे.