-8.7 C
New York
Tuesday, January 27, 2026

Buy now

कणकवलीत भाजपची भव्य प्रचार रॅली

परत एकदा परिवर्तनासाठी सज्ज – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून कणकवलीत भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रॅलीला कणकवलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या प्रसंगी बोलताना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे म्हणाले, “आम्ही शक्तिप्रदर्शन करण्यासाठी रॅली काढलेली नाही. जनतेचा पाठिंबा काय असतो, हे आज कृतीतून दिसून आले. भाजपच्या मागे जनता किती ठामपणे उभी आहे, हे कणकवलीने दाखवून दिले आहे.”

ते पुढे म्हणाले की, “संधी दिल्यास आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे पुढील पाच वर्षांत कणकवलीच्या विकासाला नवी दिशा देतील. आमच्याकडे ती ताकद आहे आणि आम्ही कणकवलीकरांच्या आकांक्षापूर्तीसाठी पूर्णपणे सज्ज आहोत.”

राणे यांनी विरोधकांवरही निशाणा साधला. “आम्ही किती अकार्यक्षम किंवा भ्रष्ट आहोत हे बघायचं असेल तर कणकवलीत फिरा, सुरू असलेले प्रकल्प पाहा. विकासाच्या जोरावर मते मागणारा हा पक्ष आहे. खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वावर कधीच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकत नाही. कणकवली भाजपचा बालेकिल्ला आहे,” असे ते म्हणाले.

विरोधकांच्या टीकेवर प्रत्युत्तर देत ते म्हणाले, “आज आमच्याविरुद्ध लढण्यासाठी विरोधकांना राणे कुटुंबातील व्यक्तींची गरज भासते, हा त्यांचा नैतिक पराभव आहे. त्यांच्याकडे स्वतःची ताकद किंवा ओळख नाही. प्रत्येक गल्लीत आजही नारायण राणे यांचाच आवाज घुमतो आहे.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री अशा सर्वांची शक्ती कणकवलीच्या सेवेसाठी सज्ज असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेनेच्या युतीबाबतही त्यांनी टोला हाणला. “शहर विकास आघाडीला दिलेला पाठिंबा हा नारायण राणे यांच्या इच्छेविरुद्ध नाही का? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्ह्यात येत असले तरी कणकवलीला न येणं दाखवून देतं की ही आघाडी २ डिसेंबरपर्यंतच आहे आणि ती राणे-द्वेषापोटी निर्माण झाली आहे,” असा आरोप राणे यांनी केला.

“कणकवलीचा विकास कोण करू शकतं, हे जनता जाणते. २ आणि ३ डिसेंबरला कणकवलीकर योग्य उत्तर देतील,” असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!