समीर नलावडे व त्यांच्या टीमने प्रामाणिकपणे विकास कामे केली ; त्याची परतफेड जनतेने मतरुपात करावी
कणकवली : भाजपाचे खा. नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली कणकवलीची सत्ता स्थापन झाल्यानंतर शहरात फार विकासात्मक बदल झालेले आहेत. दहा ते पंधरा वर्षांपूर्वी या प्रभागांची परिस्थिती काय होती ? आता परिस्थिती काय आहे, हे आपण पाहणे आवश्यक आहे. समीर नलावडे व त्यांच्या टीमने नगरपंचायतीकडे कोणतीही जमीन नसतानाही लोकांपर्यंत पोहोचून, त्यांची जमिनी देण्याची विनंती करून शहरातील रिंग रोड व अन्य विकासकामे मार्गी लावली आहेत. समीर नलावडे व त्यांच्या टीमने प्रामाणिकपणे विकास कामे केली आहेत. याची परतफेड करण्याची संधी मतदारांना मिळाली आहे, भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंधराशेच्या मताधिक्याने जिंकतील, असा विश्वास भाजपा उपाध्यक्ष गोट्या सावंत यांनी व्यक्त केला.
कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विविध प्रभागांमध्ये प्रचाराच्या निमित्त आयोजित खळा बैठकांमध्ये संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी मतदारांशी संवाद साधला. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे, नगरसेविका पदाच्या उमेदवार प्रतीक्षा सावंत , भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, सदानंद केरकर, उदय घाडी, अनिल पवार, सचिन शेंगाडे, जावेद शेख, प्रशांत सावंत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोट्या सावंत म्हणाले , विरोधी आघाडीतील नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत, ते यापूर्वीचे सरपंच आणि नगराध्यक्ष होते त्यांनी विकास का केला नाही? त्यांचे कोणी हात धरले होते का? याचा विचारही आता सुज्ञ नागरिकांनी करायला हवा. पुढील चार दिवस अनेक प्रचारसभा होतील. मात्र, त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही, कारण आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे. मतदारांनी आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करण्याची संधी आम्हाला पुन्हा मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करा, असे आवाहन जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले.
समीर नलावडे म्हणाले, खासदार नारायण राणे यांनी पोदार स्कूल सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आज जिल्हाभरातून अनेक मुले तिथे शिक्षण घेत आहेत. यामुळे कणकवली शैक्षणिक केंद्र बनले आहे. वॉर्ड क्रमांक २ च्या नगरसेविका उमेदवार प्रतीक्षा सावंत या मागील पाच वर्ष या प्रभागाच्या नगरसेविका होत्या. त्यांनी या प्रभागात केलेला विकास हा डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी मतदान केले पाहिजे. पालकमंत्री नीतेश राणे यांचे पाठबळ असल्याने या भागाचा विकास मोठ्या प्रमाणावर होईल, यात शंका नाही.
प्रतीक्षा सावंत म्हणाल्या, गेल्या मागील वेळी नगराध्यक्ष समीर नलावडे व मला तुम्ही चांगली साथ दिली. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठांनी मला व नगराध्यक्ष समीर नलावडे यांना कणकवली शहराचा विकास करण्यासाठी पुन्हा संधी दिली आहे. यावेळीही तुम्ही आम्हाला अशीच साथ द्याल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
फोटो –