कणकवली : कणकवली नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठी चालना मिळाली असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांना रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.
रिपब्लिकन सेनेचे प्रवक्ता अनिल तांबे, जिल्हाध्यक्ष रमेश बावडेकर, तसेच वैभववाडी तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी कणकवलीत भेट घेऊन संदेश पारकर यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केला.
यावेळी बोलताना अनिल तांबे म्हणाले, रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशानुसार आम्ही संदेश पारकर आणि शहर विकास आघाडीला पाठिंबा देत आहोत. संदेश पारकर यांचे राजकारण, त्यांची लोकाभिमुख भूमिका आणि जनतेशी असलेला जवळचा संपर्क यांचा विचार करून रिपब्लिकन सेनेने त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.
ते पुढे म्हणाले,
सध्या शहरातील राजकीय परिस्थितीत टप्प्याटप्प्याने बदल होत आहेत. आम्ही वस्तुस्थितीचे परीक्षण करून स्थानिक संस्था व संघटनांशी चर्चा केली. शहरातील बदलाची गरज आणि जनभावना लक्षात घेता संदेश पारकर हेच योग्य पर्याय असल्याचे स्पष्ट झाले.
तांबे यांनी यावेळी शहर विकास आघाडीच्या प्रचारात रिपब्लिकन सेना सक्रिय सहभाग देणार असल्याचे सांगितले. लोकांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी संदेश पारकर सातत्याने काम करत आहेत. त्यामुळे ते प्रत्येक घरात पोहोचले आहेत. येणाऱ्या ३ डिसेंबरला विजयाचा गुलाल उधळत संदेश पारकर कणकवलीचे नगराध्यक्ष होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.