आम. निलेश राणे, दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ
राजकोट येथील शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन
मालवण : शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्याचा संकल्प शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला आहे. त्यादृष्टीने शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांच्यासह नगरसेवक पदाच्या सर्व २० उमेदवारांनी आमदार निलेश राणे आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व नारायण मंदिरात जाऊन मालवण शहर भ्रष्टाचार मुक्त करण्याची शपथ घेतली. नगरपालिका हे आमच्यासाठी मंदिर आहे. आम्ही प्रामाणिकपणे शहर विकासासाठी काम करणार असून शहर विकासासाठी कटीबद्ध राहू, अशी शपथ यावेळी घेण्यात आली.
मालवण नगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता येणारच आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ममता वराडकर यांच्यासह आमचे सर्व २० ही उमेदवार निवडून येऊन पालिकेचा कारभार भ्रष्टाचार मुक्त करतील, असा शब्द आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिला आहे. त्यानुसार शिवसेनेच्या सर्व उमेदवारांनी आज सकाळी मालवणचे ग्रामदैवत श्री देव नारायण व रामेश्वर चरणी श्रीफळ अर्पण करून प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी भ्रष्टाचारमुक्त प्रशासन राबविण्याची शपथ घेतली. नगरपालिका हे एक मंदिर माणून या मंदिरात सुशासन येण्यासाठी आणि जनतेला विश्वास देण्यासाठी काम केले जाईल. आमदार निलेश राणे यांना अभिप्रेत असलेला सर्वांगिण विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असेही यावेळी उमेदवारांनी शपथबद्ध होताना सांगितले
यावेळी शिवसेना शहरप्रमुख दिपक पाटकर, जिल्हा समन्वयक महेश कांदळगावकर, महिला जिल्हाध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, नगराध्यक्ष उमेदवार ममता वराडकर, स्वप्नाली नेरूरकर, राजा गावकर, बबन शिंदे, राजन सरमळकर, अंकित नेरूरकर, उमेश नेरूरकर, मंदार लुडबे, भाऊ मोर्जे, परशुराम पाटकर, बाळू नाटेकर, शेखर गाड, रवी मालवणकर, शिवसेना उमेदवार वसंत गावकर, देवयानी शिर्सेकर, महेश सारंग, पूजा मांजरेकर, निना मुंबरकर, सिद्धार्थ जाधव, पूनम चव्हाण, विलास मुणगेकर, नंदिता वरवडेकर, सहदेव बापर्डेकर, अश्विनी कांदळकर, नरेश हुले, मेघा गावकर, राजन परूळेकर, शर्वरी पाटकर, महेश कोयंडे, प्रमिला मोर्जे, सीताराम लुडबे, भाग्यश्री मयेकर, विश्वास गावकर, अरूण तोडणकर, मोहन वराडकर, सौगंधराज बादेकर, संदेश चव्हाण, राजू बिडये, किसन मांजरेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री. सामंत म्हणाले, शिवसेनेचे सर्व उमेदवार हे निष्कलंक आहेत. त्यांनी आजपर्यंत समाजकार्य केलेले आहे. अनेक नविन चेहरे आम्ही निवडणूक रिंगणात उतरविलेले आहेत. नगरपालिका हे एक मंदिर असून त्याठिकाणी समाजकार्य आणि शहराचा सर्वांगिण विकास करणारे लोक येणे आवश्यक आहे. जनतेला अभिप्रेत असलेला विकास आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक वाडीवाडीचा विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. आज आम्ही ग्रामदैवत नारायण रामेश्वरचरणी हीच शपथ घेतलेली आहे. जनतेचा विकास करणार आहोत, आजपर्यंत याठिकाणी जे काही झाले ते पुन्हा होणार नाही यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
राजकोट किल्ला याठिकाणी आमदार निलेश राणे, दत्ता सामंत यांच्यासह सर्व उमेदवारांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करताना नतमस्तक झाले. छत्रपतींचा आशिर्वाद घेत मालवण नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात आमदार राणे यांनी अभिवादन केले.