9.8 C
New York
Thursday, November 13, 2025

Buy now

कळसुली येथे घरफोडी केलेला आरोपी पोलिसांच्या ताब्यात

कोल्हापूर येथील आरोपीकडून १७ गुन्ह्यांचा पर्दाफाश 

कणकवली : कळसुली (ता. कणकवली) येथील विनायक दळवी यांच्या घरात झालेल्या दिवसाढवळ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तब्बल १७ घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी संतोष रामाप्पा नंजन्नावर (रा. शिरोळ, जि. कोल्हापूर, मुळ रा. नेरली, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, कर्नाटक) या आरोपीस अटक केली असून, त्याच्याकडून सुमारे ५३ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ ते १.१० वाजण्याच्या दरम्यान कळसुली, गडगेवाडी येथील विनायक दळवी हे शेतात गेले असताना, त्यांच्या बंद घराचा मागील दरवाजाचा कडी उचकटून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोने, चांदी व रोख रक्कम असा एकूण १३ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या घटनेनंतर दळवी यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलिस ठाण्यात त्याच रात्री गुन्हा दाखल झाला होता.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढत्या दिवसाढवळ्या घरफोड्यांच्या घटनांचा तपास गतीमान करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपास, गुप्त माहिती व सातत्यपूर्ण चौकशीतून संशयित आरोपीची ओळख पटली.

पथकाने सापळा रचून आरोपी संतोष नंजन्नावर यास शिरोळ (जि. कोल्हापूर) येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १७ घरफोड्या केल्याची कबुली दिली. आरोपीकडून एकूण ५३ लाख ५१ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून, आणखी काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आरोपीविरुद्ध कणकवली पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३०२/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल असून, त्यास न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले हे करीत आहेत.

ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक कुमारी नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले, सुधीर सावंत, अनिल हाडळ, अंमलदार राजेंद्र जामसंडेकर, सुरेश राठोड, डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, प्रकाश कदम, आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, राजेंद्र गोसावी, बस्त्याव डिसोझा, विल्सन डिसोझा, आशिष जामदार, जॅक्सन घोन्साल्वीस, महेश्वर समजिस्कर, अमर कांडर तसेच सायबर पोलिस ठाण्यातील धनश्री परब व युवराज भंडारी यांनी सहभाग नोंदवला. त्यांच्या चांगल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!