३०० पेक्षा जास्त दिव्यांगांचा सहभाग
तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली सहकार्याची ग्वाही
कणकवली : दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ घ्यावयाचा असेल तर त्यांच्याकडे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे. कणकवली तालुक्यातील काही दिव्यांग बांधवांकडे हे कार्ड नाही, त्यांच्यासाठी उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे कार्ड काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग बांधवांनी आपले युडीआयडी कार्ड काढून घेऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, शासकीय योजनांचा लाभ घेताना दिव्यांग बांधवांना कोणत्याही प्रकराचे सहकार्य किंवा मदत हवी असल्यास महसूल प्रशासनाकडून केली जाईल, अशी ग्वाही तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
कणकवली तालुक्यातील दिव्यांग बांधवांचे युडीआयडी काढण्यासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात शिबीर आयोजित केल होत. याचे उद्घाटन तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्री. देशपांडे बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, कणकवली उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी, एकता दिव्यांग विकास संस्थेचे अध्यक्ष सुनील सावंत, सचिव सचिन सादये, सभासद अशोक पाडावे, संगीता पाटील, यल्लाप्पा कट्टीमनी, डॉ. बाळासाहेब जोशी, डॉ. धनंजय रासम, डॉ. सचिन डोंगरे, व्ही.यू.शिगनाथ, महसूल सहाय्यक गौरी पाटील, शुभम दळवी, वैभव फाले, सूरज घाग, अजय कदम, सोनिया तेली, परशुराम आलव, निवृत्ती माने, आरोग्य सहाय्यक प्रशांत बुचडे, विजय चौरे, कविता राऊळ, प्राप्ती सावंत, वंदना चव्हाण, प्रीती कोरगावकर, नितीका सावंत, जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग प्रमाणपत्र विभागातील श्री. पवार यांच्यासह कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. शिबिरात ३०० पेक्षा जास्त दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदविला.
दिव्यांग बांधवांना युडीआयडी कार्ड काढण्यासाठी ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात जावे लागत होते. त्यामुळे दिव्यांग बांधवांनी हे कार्ड काढण्यासाठी तालुकास्तरावर शिबीर घेण्याची मागणी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार कणकवली तालुकास्तर शिबिर येथील उपजिल्हा रुग्णालयात लावण्यात आले. सदरचे शिबिर यशस्वी होण्यासाठी शासकीय यंत्रणांनी मेहनत घेल्याबद्दल तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी सर्वांचे आभार मानले.
युडीआयडी काढल्यानंतर दिव्यांग बांधवांनी तहसीलदार कार्यालयात येऊन संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी प्रस्ताव करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले.
दिव्यांग बांधवांना तालुकास्तरावर युडीआयडी कार्ड काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकास्तरावर कॅम्प आयोजित केल्याबद्दल संगीता पाटील यांनी जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा प्रशासनाचे आभार मानले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मानसी नकाशे यांनी केले.
दरम्यान, शिबिरांतर्गत दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातील डॉक्टर व कर्मचारी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.
संस्थेकडून दिव्यांगाना अल्पोपहाराची सोय
दिव्यांग बांधवांची तपासणी करून युडीआयडी कार्ड काढण्यासाठी जिल्हाप्रशासनाने उपजिल्हा रुग्णालयात शिबीर आयोजित केले होते. त्यासाठी दिव्यांगांसह त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी झाली होती. मात्र, त्यांना अल्पोपहार देण्याची सोय प्रशासनाकडून करण्यात आली नसल्याने उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली.परंतु सदरची बाबा लक्षात घेत एकता दिव्यांग संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली. तसेच सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवलीच्या पदाधिराऱ्यांनी शितपेयाची व्यवस्था केली. याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व दिव्यांग व्यक्तींनी सिद्धिविनायक मित्रमंडळ कणकवली चे आभार मानले आहेत.