एआय प्रणालीवरील प्रेझेंटेशन पाहून सदस्यांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कौतुक
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी निती आयोगाचे सदस्य सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले आहेत. गुरुवारी सायंकाळी त्यांनी कणकवली पंचायत समितीला भेट देऊन एआय प्रणालीच्या वापराबाबत सविस्तर माहिती घेतली.
या भेटीदरम्यान पंचायत समितीच्या विविध विभागांमध्ये एआय प्रणालीचा कशा पद्धतीने प्रभावी वापर केला जातो, याचे प्रेझेंटेशन पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांनी सादर केले. एआय प्रणालीचा वापर केल्यानंतर प्रशासनात झालेल्या सकारात्मक बदलांचा अनुभव अधिकाऱ्यांनी सदस्यांसमोर मांडला.
एआयच्या मदतीने प्रशासन अधिक गतिमान आणि कार्यक्षम बनविण्याचा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व अधिकारी कर्मचाऱ्यांचा प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार निती आयोगाचे सदस्य डॉ. देवव्रत त्यागी यांनी काढले.
सिंधुदुर्ग हा एआय प्रणालीचा वापर करणारा देशातील पहिला जिल्हा ठरला आहे. या ‘सिंधुदुर्ग एआय मॉडेल’चा अभ्यास करण्यासाठी निती आयोगाचे सदस्य दोन दिवसीय दौऱ्यावर आले असून, गुरुवारी सकाळपासून त्यांनी जिल्हा प्रशासनातील विविध विभागांना भेट देऊन एआयच्या अंमलबजावणीविषयी माहिती घेतली.
सायंकाळी या टीमने कणकवली पंचायत समितीला भेट दिली.
यावेळी डॉ. देवव्रत त्यागी, डॉ. विदिशा दास, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा इंगवले-काळगे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, रामचंद्र शिंदे, मनीषा देसाई, अशोक कोकाटे, प्रमोद ठाकूर, उमेश ठाकूर आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरंभी पंचायत समितीच्यावतीने अरुण चव्हाण यांनी डॉ. त्यागी यांचा शाल, रोपाची कुंडी देऊन सत्कार केला. त्यानंतर एलईडी स्क्रीनद्वारे कणकवली पंचायत समितीच्या सर्व विभागात एआय प्रणालीचा वापर, त्यातून झालेला बदल आणि त्याचे फायदे यांचे प्रेझेंटेशन दाखविण्यात आले.
आरोग्य विभागाने तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्य स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी तयार केलेल्या एआय आधारित आरोग्य मॉडेलचे प्रेझेंटेशन विशेष लक्षवेधी ठरले.
या सादरीकरणाचे कौतुक करताना डॉ. त्यागी यांनी डॉ. पूजा इंगवले-काळगे यांचे अभिनंदन केले.
त्यानंतर त्यांनी पंचायत समितीच्या सामान्य प्रशासन विभागालाही भेट देऊन मनीषा देसाई यांच्याकडून विभागात एआयचा वापर कसा केला जात आहे, याची माहिती जाणून घेतली. शेवटी डॉ. त्यागी यांनी सांगितले की, “पंचायत समितीचे बीडीओ, खातेप्रमुख आणि कर्मचारी यांनी एआय प्रणालीचा वापर करून प्रशासनात बदल आणि गतिमानता आणण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे, तो देशातील इतर जिल्ह्यांसाठी प्रेरणादायी आहे.