अधीक्षकांची उचलबांगडी, वैद्यकीय अधिकाऱ्याची सेवा समाप्त
वैभववाडी : उंबर्डे (ता. वैभववाडी) येथील कु. सुंदरा प्रकाश शिवगण (वय २५) या तरुणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील गंभीर निष्काळजीपणावर अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अर्जुन नरोटे यांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून, वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल माकोडे यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.
घटनेनुसार, बुधवारी संध्याकाळी कु. सुंदरा शिवगण हिला प्रकृती अस्वस्थ झाल्याने नातेवाईकांनी वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना डॉ. माकोडे यांनी तिला सलाईन लावले आणि रुग्णालय सोडून निघून गेले. त्याच वेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरोटे हे घरी विश्रांती घेत होते, तर रुग्णालयात केवळ आरोग्यसेविका उपस्थित होती.
रुग्णाची प्रकृती अचानक खालावल्याने तिला ओरोस येथे हलविण्यासाठी १०८ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला, मात्र ती वेळेत आली नाही. १०२ रुग्णवाहिकेच्या चालकाला संपर्क साधण्याचाही निष्फळ प्रयत्न झाला. अखेर नातेवाईकांनी स्वतःच्या प्रयत्नाने सुंदरा हिला खाजगी वाहनातून रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, पण वाटेतच तिचा मृत्यू झाला.
या धक्कादायक घटनेनंतर भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी रुग्णालयात धाव घेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. त्यांनी दोन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. अखेर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पाटील यांनी तात्काळ कठोर निर्णय घेत डॉ. नरोटे यांची बदली ओरोस येथे केली, तर डॉ. माकोडे यांची सेवा समाप्त करण्यात आली.
दरम्यान, वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकपदाचा तात्पुरता कारभार डॉ. समीर पोटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.या कारवाईनंतर नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.