दिव्यांग लाभार्थ्यांसाठी संधी
कणकवली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनांखालील अनुदानात वाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रतीमहिना १५०० रुपये असलेले अनुदान आता २५०० रुपये करण्यात आले आहे.
कणकवली तालुक्यातील १०८३ दिव्यांग लाभार्थ्यांपैकी ७१७ जणांकडे UDID कार्ड आहे, तर ३६६ लाभार्थ्यांकडे ते अद्याप नाही. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार सर्व दिव्यांगांसाठी UDID (Unique Disability ID) कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सक, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दि. ४ नोव्हेंबर २०२५ रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सकाळी ११ ते सायं. ६ या वेळेत दिव्यांग UDID नोंदणी व पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालय ओरोस येथील वैद्यकीय पथक या शिबिरात उपस्थित राहून आवश्यक तपासणी करणार आहे. सामाजिक न्याय विभागाच्या लाभार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन आपली UDID नोंदणी व पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन कणकवलीचे तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.