सिंधुदुर्गात ‘कॅन्डला’चा कारखाना.!
नाम. नितेश राणेंच्या स्वीडन दौऱ्याला विकासाची नवी दिशा
सिंधुदुर्ग | मयुर ठाकूर : जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे यांचा अलीकडील स्वीडन दौरा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण धोरण होते.
स्वीडन हा देश जलवाहतुकीसाठी आणि तंत्रज्ञानातील नावीन्यासाठी जगभर ओळखला जातो. याच पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी तेथील प्रसिद्ध ‘कॅन्डला (Candela)’ कंपनीला भेट देऊन त्यांच्या कार्यपद्धतीचा, उत्पादन क्षमतेचा आणि तांत्रिक कौशल्याचा सखोल अभ्यास केला.
ही कंपनी इलेक्ट्रिक बोटींचे उत्पादन करते, ज्यांची क्षमता एकावेळी सुमारे 30 प्रवासी वाहून नेण्याची आहे. आधुनिक, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक अशा या बोटी इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत करतात. ‘कॅन्डला’ची एक इलेक्ट्रिक बोट येत्या डिसेंबर महिन्यात भारतात दाखल होणार असून ती गेटवे ऑफ इंडिया येथे उतरवली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुमारे १२१ किलोमीटरचा विस्तीर्ण आणि सुरक्षित समुद्रकिनारा या कंपनीसाठी उत्पादन केंद्र उभारण्यासाठी आदर्श ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात कारखाना उभारण्याबाबत चर्चा पुढे नेण्यात आली आहे.
जर ‘कॅन्डला’चा कारखाना सिंधुदुर्गात उभा राहिला, तर जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला मोठी गती मिळेल. तसेच जिल्ह्यातील असंख्य तरुणांना स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.
स्वीडन दौऱ्याच्या माध्यमातून पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक नैसर्गिक संसाधनांचा मेळ घालून सिंधुदुर्गच्या विकासाला नवी दिशा देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न सुरू केला आहे.