तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असण्याची शक्यता
कणकवली : मुंबई–गोवा महामार्गालगत साळीस्ते येथील गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला होता. शरीरावर धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा आढळून आल्या होत्या. त्यामुळे हा खून असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
मृतदेहाची ओळख पटली
पोलिस तपासाची चक्रे फिरवत मृतदेहाची ओळख पटविण्यात आली असून, तो श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर, कर्नाटक) यांचा असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. सदर व्यक्ती तीच आहे का याची खात्री करण्यासाठी पोलिसांचे एक पथक बेंगलोरकडे रवाना होणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी दिली.
तीन दिवसांपूर्वी हत्या झाल्याचा अंदाज
प्राथमिक तपासात मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वी टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
*धारदार शस्त्रांनी १३ ते १४ वार*
शवविच्छेदन करताना मृतदेहावर धारदार शस्त्राने १३ ते १४ वार झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मृतदेहावर शर्ट आणि हाफ पँट होती. घटनेनंतर उपजिल्हा रुग्णालयात रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी पाहणी
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तसेच पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा सर्वांगीण तपास सुरू असून, गुन्ह्याचा धागा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ओळख पटविण्यासाठी बेंगलोरमधून दोन व्यक्तींना बोलावले
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मेंगलोर येथील दोन व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना कणकवलीत बोलावले. मात्र, मृतदेह कुजलेला असल्याने ओळख पटविणे कठीण गेले. नंतर पोलिस तपासात तो मृतदेह श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले.
दोडामार्ग येथे रक्ताने माखलेली कार
साळीस्ते येथे मृतदेह आढळला त्याच दिवशी दोडामार्ग तिलारी वसाहतीच्या पुलाजवळ एक रक्ताने माखलेली कार आढळली. कार सुस्थितीत असली तरी आत मोठ्या प्रमाणावर रक्ताचे सडे होते. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत.
ती कार आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर
कारचा चेसिस आणि इंजिन नंबर तपासल्यानंतर ती कार आंध्र प्रदेशमधील असल्याचे समोर आले आहे. साळीस्ते येथे सापडलेल्या मृतदेहाचा आणि या कारचा काही संबंध आहे का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक तेजस नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, साळीस्ते खून प्रकरणाचा उलगडा लवकरच होईल, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.