कॉलेजमधील शिपाई महिलेनेच ऐन दिवाळीत केली हातसफाई
२४ तासांत संशयित महिलेच्या अटकेने पोलिसांना मोठे यश
कणकवली :
जानवली येथील रिगल कॉलेजमधील कपाटातून ५ लाख ४ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या संशयिताचा सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने (एलसीबी) अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. या गुन्ह्यात कॉलेजमधीलच शिपाई पदावर कार्यरत असलेली मानसी मनीष तेली (रा. नाटळ, राजवाडी) हिला अटक करून कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास एलसीबी पथकाने संशयित मानसी तेली हिला तिच्या राहत्या घरी ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली दिल्याचे समजते. तसेच चोरीतील काही रक्कमही पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती मिळत आहे.
१८ ऑक्टोबरला फी जमा – १९ ऑक्टोबरला चोरी
१८ ऑक्टोबर रोजी विद्यार्थ्यांकडून फी जमा केल्यानंतर क्लार्क वृषाली परब यांनी ६ लाख ४२ हजार १०१ रुपयांची रोकड कॉलेजच्या नोंदवहीत दाखल करून लॉकरमध्ये ठेवली होती. त्यापैकी ₹२७,५०० रक्कम कॉलेजच्या बँक खात्यात जमा करून उर्वरित ₹६,१४,६०१ कपाटात ठेवली होती.
१९ ऑक्टोबर रोजी दुपारी कॉलेज परिसरात एक महिला आणि एक अनोळखी पुरुष फिरताना ग्रामस्थांना दिसले. त्यांनी त्वरित पोलिसांना कळवून त्या दोघांना ताब्यात दिले. त्याच दिवशी क्लार्क परब यांनी कपाट तपासले असता केवळ ₹१,१०,००० रुपयेच आढळले. त्यामुळे उर्वरित ५ लाखांहून अधिक रक्कम चोरीस गेल्याचे स्पष्ट झाले. परब यांनी तत्काळ कणकवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सीसीटीव्ही बंद, तरीही तांत्रिक तपासातून उकल
या गुन्ह्याची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, तसेच डीवायएसपी घनःशाम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
एलसीबीचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार आशिष गंगावणे, किरण देसाई, ज्ञानेश्वर तवटे, महिला कॉन्स्टेबल स्वाती सावंत, तसेच कणकवली पोलिसांचे पथक तपासात सहभागी झाले.
कॉलेजमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरुवातीला पोलिसांना अडचणी आल्या. मात्र तांत्रिक तपास आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मानसी तेली हिच्यावर संशय आला.
एलसीबी पथकाने तत्काळ कारवाई करून तिच्या घरावर छापा टाकला आणि तिला ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजत असून पुढील तपास कणकवली पोलिस करत आहेत.