शिवसेना कमकुवत नाही, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासच खरी ताकद
महाविकास आघाडीतून निवडणूक लढवू
स्थानिकांना अधिकार देऊ
कणकवली : “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकरे सेना काहीशी कमकुवत होत असल्याची चर्चा असली, तरी ही केवळ तात्पुरती स्थिती आहे. काही कार्यकर्ते भाजप किंवा शिंदे गटात जात असले, तरी मतदार आणि शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबतच ठामपणे उभे आहेत,” असे मत माजी आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, “शिवसेनेला अशी परिस्थिती नवीन नाही. आम्ही यापूर्वीही संकटातून मार्ग काढला आहे आणि पुन्हा एकदा स्वबळावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताकद निर्माण करू. ठाकरे गटात येणारे कार्यकर्ते केवळ आमच्या प्रेमापोटी नव्हे, तर सत्य विचारसरणीच्या आधारावर येत आहेत. त्यामुळे शिवसेनेची फळं कुठेही कमकुवत होत नाहीत.”
“महाविकास आघाडीतून निवडणूक ताकदीने लढवू”
माजी आम. वैभव नाईक म्हणाले, “महाविकास आघाडीच्या माध्यमातून आगामी निवडणुका लढवण्यात येतील. मात्र स्थानिक स्तरावर युतीचा निर्णय स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांना अधिकार देतच केला जाईल. ही निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढवू.”
त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की, “आपल्या विचारांशी प्रामाणिक राहा, परिस्थिती बदलते पण शिवसेनेचा आत्मा आणि शिवसैनिकांचा विश्वास कायम आहे. जनतेचा पाठिंबा हे आमच सर्वात मोठ भांडार आहे.”