सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार राबवले अभियान
महसूल व शिक्षण विभागाची संयुक्त कामगिरी — तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांचे मार्गदर्शन
कणकवली (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या अभिनव संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत “शाळा तेथे दाखले” या अभियानात कणकवली तालुक्यात उल्लेखनीय यश मिळाले आहे. या मोहिमेद्वारे पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वय, अधिवास व जातीचे दाखले थेट शाळांच्या माध्यमातून घरपोच देण्यात आले. या अभियानात तालुक्यातील ८८२५ वय-अधिवास दाखले व ८०५ जात दाखले असे मिळून एकूण ९६३० दाखले विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली.
या मोहिमेसाठी प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरीत्या काम केले. सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी, सीएससी व महा ई-सेवा केंद्र चालक, तसेच सेतू केंद्रांनी जलद गतीने काम पूर्ण केले. शिक्षण विभागातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावली.
यामध्ये गंगाराम कोकरे, मंगेश यादव, मंडले, मंगल गायकवाड, हेमलता तोरसकर, संभाजी खाडे, विलास चव्हाण, चाळके, सिंगनाथ, रणजीत चौगुले, अंकिता बागवे, कांबळे आदींचा विशेष सहभाग राहिला.
जिल्हाधिकारी यांच्या “एकही पात्र विद्यार्थी दाखल्यापासून वंचित राहू नये” या संकल्पाचे सर्व पालकांनी स्वागत केले असून, या उपक्रमाबद्दल समाधान व कौतुकाची भावना व्यक्त केली जात आहे. महसूल व शिक्षण विभागाच्या संयुक्त प्रयत्नांतून कणकवली तालुक्याने सेवा पंधरवड्यात उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.