दिवसभर उष्णतेने नागरिक हैराण
ढगांच्या गडगडाटासह कोसळलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली
कणकवली : दिवसभर प्रखर उष्णतेने नागरिक हैराण झाले असतानाच बुधवारी सायंकाळी अचानक पावसाने हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास काही मिनिटांतच आकाश काळवंडले आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला.
अचानक आलेल्या या पावसाने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा दिला असला, तरी शेती पिकांसाठी मात्र हा पाऊस धोकादायक ठरला आहे. परिसरात भात कापणीला सुरुवात झालेली असताना झालेल्या या अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणी शेतात कापणीसाठी ठेवलेले भात ओलाव्याने खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोकणात दिवसाढवळ्या उष्णतेची तीव्रता वाढली असून, वातावरणात आर्द्रता जास्त आहे. अशातच बुधवारी झालेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला, मात्र शेतीचे नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.