चिन्मय खवळे यांचं होतंय सर्वत्र कौतुक
देवगड : तारामुंबरी खाडीत तोल जाऊन पाण्यात बुडत असलेल्या ४५ वर्षीय महिलेला तारामुंबरी येथील चिन्मय खवळे या धाडसी युवकाने तात्काळ पाण्यात उडी मारून वाचवले. ही घटना आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.
जामसंडे-भटवाडी येथील संगीता गोविंद आचरेकर (४५) या आज दुपारी देवगडहून तारामुंबरी मार्गे खाडीवरील बांधाऱ्यावरून चालत घरी जात असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या थेट खाडीच्या पाण्यात पडल्या. ही घटना तारामुंबरी येथील पूर्वा तारी यांनी पाहिली आणि त्यांनी मदतीसाठी आरडाओरड केली. याच दरम्यान मुंबईत पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेले विरेंद्र खवळे हे त्या ठिकाणाहून जात होते. त्यांनी हा आरडाओरड ऐकून तात्काळ सूर्यकांत खवळे यांना फोन करून घटनेची माहिती दिली. सूर्यकांत खवळे यांनी त्वरित चिन्मय खवळे आणि अक्षय खवळे यांना बांधाऱ्याकडे जाण्यास सांगितले.
चिन्मय खवळे आणि अक्षय खवळे घटनास्थळी पोहोचले असता, त्यांना एक महिला पाण्यात बुडताना दिसली. गोव्यात स्कूबा डायव्हिंग ट्रेनर म्हणून कार्यरत असलेल्या चिन्मय खवळे यांनी कोणतीही भीती न बाळगता क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी मारली. पोहत त्या महिलेपर्यंत पोहोचून त्यांनी तिला सुरक्षितपणे बाहेर काढले आणि तिचे प्राण वाचवले.
मोठे धाडस दाखवून एका महिलेचे प्राण वाचविल्याबद्दल खवळे महागणपती ट्रस्टचे ट्रस्टी असलेले चिन्मय खवळे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.