कणकवली : इंस्टाग्रामवर युवतीच्या नावे फेक अकाउंट तयार करून त्याद्वारे युवतीलाच अश्लील मेसेज केल्याप्रकरणी राजेश्वर रामदास टारपे (२९, रा. नाटळ ,सुतारवाडी) याला कणकवली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला नोटीस देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
संबधित घटना ८ सप्टेंबरला उघडकीस आली होती. याबाबत युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर गुन्हा शाखेने तपास केल्यानंतर संबधित प्रकार राजेश्वर यानेच केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यात आले. संबधित गुन्ह्यांमध्ये कमी शिक्षा असल्याने आरोपीला अटक करता येत नाही. त्यामुळे राजेश्वर याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करत नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. राजेश्वर हा गोव्यामध्ये हाउसकीपिंगचे काम करायचा, असेही पोलिसांनी सांगितले.