पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश
कणकवली : केंद्र सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील अग्रगण्य उपक्रम शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SCI) यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला तब्बल ४५ लाख रुपयांची अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे दिली आहेत. यासाठी पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या पुढाकारातून पाठपुरावा करण्यात आला होता.
या उपकरणांमध्ये सी-आर्म मशीन, लॅप्रोस्कोपिक सेट, बायोकेमिस्ट्री ॲनालायझर, ऑर्थोपेडिक टेबल यांसारखी अत्याधुनिक साधने आहेत, ज्यामुळे उपजिल्हा रुग्णालय कणकवलीतील उपचार व्यवस्था मोठ्या प्रमाणात सुधारली जाणार आहे. शनिवार, ११ ऑक्टोबर रोजी शिपिंग कॉर्पोरेशनचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांच्या हस्ते या मशिनरीचे लोकार्पण करण्यात आले.
या प्रसंगी भिरवंडे गांधीनगर सरपंच मनोज बोभाटे, उपसरपंच राजेंद्र सावंत, हुंबरठ उपसरपंच श्री. होळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंकज पाटील, सहा. अधिसेविका एस. एस. तिवरेकर, परीसेविका सी. आर. सावंत, तसेच नितीन सावंत, वैभव फाले, विजय चौरे, प्रशांत बुचडे, दीपक दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी चंद्रशेखर चव्हाण यांनी सांगितले की, “शिपिंग कॉर्पोरेशनने समाजाशी असलेली आपली बांधिलकी जपत ग्रामीण आरोग्य क्षेत्राला मदत करण्याचा संकल्प केला आहे. कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, हीच आमची अपेक्षा आहे.”
वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील म्हणाले, या उपकरणांमुळे शस्त्रक्रिया विभाग व प्रयोगशाळेतील कामकाज अधिक प्रभावी होणार आहे. बायोकेमिस्ट्री ॲनालायझरमुळे तपासण्या जलद व अचूक होतील, तर लॅप्रोस्कोपिक सेट ग्रामीण भागात अल्प खर्चात शस्त्रक्रिया शक्य करेल.
रुग्णालय प्रशासनाने पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष आभार मानले.
नाम. नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळेच ही मदत शक्य झाल्याचे सांगण्यात आले.
यावेळी राजेंद्र सावंत म्हणाले की, या मशिनरीमुळे रुग्णांना उपचारांसाठी तालुक्यासह जिल्ह्याबाहेर जाण्याची आवश्यकता भासणार नाही व योग्य वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचतील, अशी भावना श्री. सावंत यांनी व्यक्त केली.
आरोग्य सेवेला मिळणार नवा वेग
या उपकरणांमुळे उपजिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभाग, शस्त्रक्रिया कक्ष व प्रयोगशाळा हे तीन महत्त्वाचे विभाग सक्षम होतील. सी-आर्म मशीनमुळे हाडांच्या शस्त्रक्रियांमध्ये अचूकता वाढेल, तर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांमुळे रुग्णाचा पुनर्वसन काळ कमी होईल.
उपस्थितांनी केले समाधान व्यक्त
उपस्थितांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करताना सांगितले की, “पूर्वी किरकोळ शस्त्रक्रियांसाठीसुद्धा कोल्हापूर किंवा गोव्याला जावे लागायचे, आता अशी सेवा स्थानिक पातळीवरच मिळणार आहे.”