कणकवली : भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मा. न्यायमूर्ती श्री. भूषण गवई यांच्यावर दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी न्यायालयात राकेश किशोर तिवारी या वकिलाकडून करण्यात आलेल्या चप्पलफेक प्रकाराचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेचा संविधानिक हितकारिणी महासंघ, सिंधुदुर्ग तर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, महासचिव गौतम खुडकर, उपाध्यक्ष सुशील कदम तसेच निमंत्रक विनोद कदम आणि किरण जाधव यांनी संयुक्त निवेदनाद्वारे सांगितले की, “ही घटना अत्यंत खेदजनक, लाजिरवाणी आणि लोकशाहीला काळिमा फासणारी आहे. सर्वोच्च न्यायालयासारख्या संविधानिक संस्थेतील न्यायमूर्तीवर असा भ्याड हल्ला होणे ही भारतीय न्यायव्यवस्थेवरील थेट कुरघोडी आहे.”
निवेदनात पुढे म्हटले आहे की, केवळ निषेध व्यक्त करून अथवा त्या माथेफिरू वकिलाची सनद रद्द करून किरकोळ शिक्षा देणे पुरेसे ठरणार नाही. संबंधित राकेश किशोर तिवारी याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात कोणीही अशा प्रकारे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीचा अपमान करण्याची हिंमत करू नये, अशी मागणी महासंघाने केली आहे.
संविधानिक हितकारिणी महासंघाने या घटनेला भारतीय लोकशाहीवरचा घातक प्रहार असे संबोधले असून न्यायपालिका, संसद आणि कार्यपालिका या तीनही स्तंभांची प्रतिष्ठा व आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.