कणकवली | मयुर ठाकूर : कणकवली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी राखीव झाले आहे. नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ करीता आरक्षण सोडत (आज ) बुधवार ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. नगरपंचायतीच्या सभागृहातील दुसऱ्या मजल्यावर होणार आहे. या सोडतीला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी केले आहे.
राज्यातील नगराध्यक्षपदांसाठी आरक्षण सोमवारी जाहीर झाली आहे. यात कणकवली नगरपंचायतीचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित झाले आहे. आज प्रभागनिहाय आरक्षण निश्चित होणार आहे. कणकवली शहरातील १७ प्रभागांमध्ये कुठले आरक्षण निश्चित होणार याबाबतचीही उत्सुकता शहरवासीयांसह व इच्छुक उमेदवारांमध्ये लागून राहिली आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या कार्यकारिणीची मुदत मे २०२३ मध्ये संपली. त्यानंतर नगरपंचायतीवर प्रशासकीय राजवट सुरू झाली. आगामी काळात नगरपरिषदा, नगरपंचायती यांच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष पदांसाठीच्या आरक्षण सोडतीत कणकवलीचे नगराध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी निश्चित झाल्याने खुल्या प्रवगार्तून निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.
कणकवलीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून समीर नलावडे, गणेश उर्फ बंडू हर्णे यांची नावे चर्चेत आहेत. तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून संदेश पारकर आणि त्यांचे बंधू कन्हैया पारकर यांची नावे चर्चेत आहेत.