प्रवाशांचा संताप, जबाबदार अधिकारी मौनधारणेवर
शिवडाव ग्रामपंचायत सदस्य नितीन गांवकर यांनी अधिकऱ्यांना धरले धारेवर
कणकवली : शिवडाव-दारीस्ते मार्गावरील एस.टी. बससेवेचा खेळखंडोबा काही केल्या थांबत नाही. सोमवारी सकाळी ७.४० वाजता सुटणारी कणकवली – शिवडाव थळकरवाडी बस ब्रेकडाऊनमुळे सुटलीच नाही, तर रविवारी सायंकाळी ७ वाजता सुटणारी वस्तीची बस तब्बल सव्वा नऊ वाजता कणकवलीवरून निघाली. परिणामी प्रवाशांना तसेच शाळकरी मुलांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या विषयाकडे शिवडाव ग्रामपंचायत सदस्य नितीन गांवकर आणि सोशल मीडिया प्रमुख स्वप्नील वर्दम यांनी लक्ष वेधले.
यावेळी डेपो मॅनेजर श्री. गायकवाड, वाहतूक नियंत्रक श्री. परब, सहाय्यक वाहतूक नियंत्रक श्री. कदम आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, शिवडाव – दारीस्ते बसच्या वारंवार तक्रारी असून या बसने बहुतांश शाळकरी मुले प्रवास करतात. बस सेवेचा वारंवार होणारा खेळखंडोबा लक्षात घेऊन अनेकदा लक्ष वेधण्यात आले, मात्र अधिकारी कर्मचारी ‘हम करे सो कायदा’ या भूमिकेत असल्याची टीका करण्यात येत आहे. “एस.टी.ची चौकशी करण्यासाठी संपर्क केला तर नेहमी चौकशी कक्षातील फोन उचलून बाजूला ठेवला जातो, तर जबाबदार अधिकारी फोनही उचलत नाहीत,” यापुढे शिवडाव मार्गावरील बस सेवा खंडित झाली तर घेराव घालण्यात येईल, अशा तीव्र शब्दांत नितीन गांवकर यांनी नाराजी व्यक्त केली.