जि.प. शाळा आशिये येथे बदलीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न
कणकवली : जि.प. शाळा आशिये येथे कार्यरत असलेल्या शिक्षिका नेहा मोरे यांच्या बदलीनिमित्त त्यांच्या सन्मानार्थ सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेला दिलेल्या प्रेमाच्या आणि आठवणींच्या ओलाव्याने वातावरण भारावून गेले.
दरम्यान नेहा मोरे यांनी आपल्या मनोगतात सांगितलं की, “या शाळेत मी जे काही दिलं, त्यापेक्षा कितीतरी अधिक मला विद्यार्थ्यांकडून प्रेम, स्नेह आणि विश्वास मिळाला. तोच माझ्यासाठी खरा पुरस्कार आहे. इथल्या आठवणी, माणसं आणि विद्यार्थ्यांचे हास्य माझ्या हृदयात कायम कोरले जाईल.” त्यांच्या या भावनिक शब्दांनी उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका शिल्पा सावंत, शिक्षक सतीश कदम, शिक्षिका वृषाली मसुरकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निधी पुजारे, उपाध्यक्ष संजय बाणे, सौ. पांचाळ तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
शाळेच्या वतीने सौ. मोरे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सौ. मोरे यांनी बदलीनिमित्त शाळेला सिलींग पंख्यांची भेट देत आदर्श निर्माण केला आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी दिलेली ही भेट शाळा व्यवस्थापन आणि पालकवर्गाने कौतुकाने स्वीकारली. आशिये शाळेत अनेक वर्षे सेवा बजावणाऱ्या सौ. मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची सर्वांनी प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सतीश कदम सर यांनी केले.
सौ. मोरे यांच्या पुढील वाटचालीस सर्व उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.