माजी आम. वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
हायवेच्या अधिकऱ्यांची व ठेकेदारांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग गेल्या काही वर्षांपासून जनतेच्या जीवाशी खेळत आहे. खड्डे, नादुरुस्त पूल, अपुरी प्रकाशयोजना, अनधिकृत कटिंग्ज आणि ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे हा महामार्ग ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. या गंभीर परिस्थितीवर शिवसेनेने प्रशासन, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. कुडाळ शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी जनतेच्या भावना व्यक्त करत प्रशासनाला जाब विचारला.
“खारेपाटण ते बांदा या मार्गावरील महामार्गाची अवस्था दयनीय आहे. हजारो कोटींच्या खर्चाने कामे झाल्याचे दाखवले गेले, पण दर्जा शून्य आहे. ठेकेदारांनी आणि अधिकाऱ्यांनी मिळून सरकारी तिजोरीची लूट केली आहे. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही, रस्त्यावर खड्डे आणि झाडी वाढलेली आहे. मग हे काम जनहितासाठी झाले की भ्रष्टाचारासाठी?” असा जळजळीत सवाल पारकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाला पडला आहे. झाराप येथे झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला. माजी आमदार वैभव नाईक घटनास्थळी पोहोचले आणि जनतेचा आवाज उठवला, पण उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे जो सत्य बोलतो त्याच्यावर कारवाई, आणि ज्यांच्या निष्काळजीपणामुळे लोक मरतात त्यांच्यावर मात्र काहीच नाही! ठेकेदार व अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
पारकर म्हणाले, “हायवेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसते, सिग्नल व्यवस्था नाही, पूल नादुरुस्त आहेत, आणि अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ते नाहीत. कसालसारख्या ठिकाणी आरोग्य केंद्र, शाळा, बसस्थानक असूनही नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. ही परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जिवंत उदाहरण आहे.”
“मुकेश साळुंखे सारखे मुजोर अधिकारी जिल्ह्यात राहू नयेत. त्यांची बदली करून जबाबदार अधिकारी आणावेत, जे जिल्ह्याला सुरक्षित आणि दर्जेदार रस्ते देतील. शिवसेना लोकांसाठी लढत राहील. आमचा आवाज गुन्हे दाखल करून दाबता येणार नाही,” असा इशारा पारकर यांनी दिला.
त्यांनी पुढे म्हटले, “हजारो कोटींच्या कामांमधील भ्रष्टाचार, अपघातांचा वाढता आलेख आणि प्रशासनाची बेफिकिरी हे सर्व जिल्हावासीयांच्या जीवावर उठले आहे. हायवेवरील अपघात म्हणजे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे थेट उदाहरण आहे. ठेकेदार, अधिकारी आणि सत्ताधारी हेच या दुर्घटनांना जबाबदार आहेत.”
अखेरीस पारकर यांनी ठाम मागणी केली की, “माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर ॲट्रॉसिटी कलमान्वये दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अपघातमुक्त राष्ट्रीय महामार्ग मिळावा, यासाठी शिवसेना अखेरपर्यंत लढा देईल.”
यावेळी कृष्णा धुरी, योगेश धुरी, अमित राणे, अवधूत मालांडकर, अमरसेन सावंत, मंदार शिरसाट, बबन बोभाटे, राजन नाईक, संतोष शिरसाट, शोहेब खुल्ली आदी उपस्थित होते.