नामांकित बँकेच्या लोगोचाही हॅकर्स ने केलाय वापर
कणकवलीत धक्कादायक प्रकार उघड
कणकवली : बनावट APK-PDF फाईल डाउनलोड केल्यामुळे कणकवली तालुक्यातील एका नागरिकाचा मोबाईल फोन तसेच व्हॉट्सअॅप अकाऊंट हॅक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
व्हॉट्सअॅपवर आलेली APK – PDF फाईल आणि त्यावर असलेला एका नामांकित बँकेचा लोगो पाहून त्या व्यक्तीने सदरची APK – PDF फाईल अधिकृत कागदपत्रासारखी भासत असल्याने उघडताच संपूर्ण मोबाईल हॅकर्सच्या ताब्यात गेला. फोनवरील सर्व मेसेज, फोटो, व्हिडिओ आणि संपर्क यादी हॅकर्सच्या हाती गेली. इतकेच नव्हे तर त्या अकाऊंटमधून ओळखीच्या व अनोळखी लोकांना दिशाभूल करणारे मेसेज, फोटो व व्हिडिओ पाठवून गैरवापर केल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे संबंधीत व्यक्ती, व त्याचे नातेवाईक, मित्र परिवारात गोंधळ उडाला. त्याने कणकवली पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. याबाबत पुढील कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.
अनोळखी क्रमांकावरून आलेल्या APK किंवा PDF फाईल्स कधीही डाउनलोड किंवा क्लिक करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. संशयास्पद फाईल मिळताच ती त्वरित डिलिट करावी आणि कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर करू नये, असा इशाराही देण्यात आला आहे.