कणकवली : फोंडाघाट जलसंपदा वसाहतीतील पाटबंधारे विभागाच्या गोडावूनमधून तब्बल ९५ हजार रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सहाय्यक अभियंता आकाश ज्ञानेश्वर जाधव यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फोंडाघाट येथील गोडावून पाटबंधारे कार्यालयाचा चार्ज सहाय्यक अभियंता जाधव यांच्याकडे आहे. कार्यालयातील चौकीदार ज्ञानेश्वर परब यांनी २० सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता नेहमीप्रमाणे गोडावून बंद करून कुलूप लावले. दुसऱ्या दिवशी रविवार सुट्टी असल्याने ते हजर झाले नव्हते. मात्र २२ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ड्युटीवर गेल्यावर दरवाजा उघडा असून खिडकीचे लोखंडी ग्रील तोडलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत त्यांनी तात्काळ अभियंता जाधव यांना कळवले. जाधव यांनी गोडावूनची पाहणी केली असता, १६० मि.मी. स्लुईस व्हॉल १६ नग(किंमत सुमारे ८० हजार), ९० मि.मी. स्लुईस व्हॉल (किंमत सुमारे ३ हजार) आणि २ नग व्ही-नॉच (किंमत सुमारे १२ हजार) असा एकूण ९५ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.