समुद्राची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी – मंत्री नितेश राणे
मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त शनिवारी सकाळी वर्सोवा–वेसावे समुद्र किनाऱ्यावर ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ या मोहिमेअंतर्गत मोठ्या उत्साहात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सहभाग घेतला.
राणे यांनी यावेळी ‘प्लास्टिकमुक्त कोळीवाडे’ करण्याचा संकल्प जाहीर केला. मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबविण्यात आले.
समुद्र किनारी पसरलेल्या प्लास्टिक, पिशव्या, बाटल्या व इतर कचऱ्यामुळे मत्स्य उत्पादनावर गंभीर परिणाम होतो, असे सांगत राणे म्हणाले, “समुद्र आपला आहे, जसा आपला घराचा आहे; त्याची स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.”
या उपक्रमात कोळी बांधव, स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि किनाऱ्यावरील कचरा हटवून समुद्र संवर्धनाचा संदेश दिला.