मुंबई : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त ‘समुद्र माझा, मी समुद्राचा’ या उपक्रमांतर्गत वर्सोवा-वेसावे समुद्र किनाऱ्यावर आज (शनिवार) सकाळी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या मोहिमेत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला.
यावेळी मंत्री राणे यांनी ‘प्लास्टिक मुक्त कोळीवाडे’ ही घोषणा केली. मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते.
मंत्री राणे म्हणाले, “कोळी बांधवांचा उदरनिर्वाह समुद्रावर अवलंबून आहे. मात्र आपणच कळत-नकळत प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कचरा समुद्रात फेकतो. हा कचरा माशांसोबत जाळ्यात येतो आणि मत्स्य उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे समुद्राची स्वच्छता आपल्या घराप्रमाणे राखणे गरजेचे आहे.”
या मोहिमेत स्थानिक मच्छीमार, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. किनाऱ्यावर साचलेला प्लास्टिक आणि इतर कचरा गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.