भरतीसाठी रत्नागिरी जिल्हा बँकेत १००० रु. अर्ज शुल्क तर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत १७७० रु.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने लिपिक पदासाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये एकूण ७३ जागा भरल्या जाणार आहेत हि चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल दुमत नाही. मात्र या भरतीसाठी सर्व श्रेणीतील उमेदवारांकडून तब्बल १७७० रु. अर्ज शुल्क आकारले जात आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गतवर्षी दि.०१/०८/२०२४ रोजी अशाच प्रकारची भरती प्रक्रिया राबविली होती या भरतीसाठी १००० रु. अर्ज शुल्क घेतले होते. मग सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून लिपिक पद भरतीच्या अर्जासाठी ७७० रु. चे अतिरिक्त शुल्क का आकारण्यात येत आहे? ७३ पदांच्या भरती प्रक्रियेसाठी आतापर्यंत सुमारे ७ हजार स्थानिक बेरोजगार तरुण तरुणींनी अर्ज दाखल केले आहेत. आणि ज्यांची भरती होणार नाही त्यांना हे अर्ज शुल्क मागे देखील दिले जाणार नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील भाजप पक्षाच्या सत्ताधाऱ्यांकडून स्थानिक तरुण-तरुणींची मोठ्या प्रमाणात लूटमार आणि फसवणूक करण्यात येत आहे अशी पोलखोल माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
जिल्हा बॅंकेत भरती प्रक्रिया होणार असल्याने अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना बँकेत भरती करण्याची आश्वासने दिली आहेत. तसेच आर्थिक व्यवहार करून काहींची भरती करण्यात येणार असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. त्यामुळे हि भरती स्पर्धात्मक होणार कि नाही याबाबत साशंकता आहे.त्यामुळे १७७० रु. अर्ज शुल्क भरूनही नोकरीची शाश्वती नाही. आणि रत्नागिरी जिल्हा बँकेच्या तुलनेत सिंधुदुर्गच्या उमेदवारांना ७७० रु.चा भुर्दंड सोसावा लागणार असून भरती न झाल्यास उमेदवाराला पैसे मागे देखील दिले जाणार नाहीत.हे पैसे अध्यक्ष आणि सत्ताधारी संचालकांचा खिशात जाणार आहेत असे वैभव नाईक म्हणाले आहेत.