कळसुलीची तनया परब सैन्यात लेफ्टनंट
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कळसुली (परबवाडी) येथील तनया संतोष परब हिने भारतीय सैन्यदलाच्या अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होत लेफ्टनंट पद मिळवले असून तिची कारगिल येथे नियुक्ती झाली आहे. ८ माऊंटन ब्रिगेडच्या १५४ आर्टिलरी फॉरवर्ड रेजिमेंटमध्ये ती कर्तव्य बजावणार आहे.
तनयाने मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले. थेट परीक्षेद्वारे लेफ्टनंट पद मिळवणारी ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली महिला ठरली आहे. सैनिकांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडाळ तालुक्यातील शिवापुर येथील भारतीय हवाई दलातील शहीद जवान सुभाष दाजी शिंदे यांची ती नात आहे. कुटुंबाचा सैनिकी वारसा पुढे नेत तिने देशसेवेचे स्वप्न पूर्ण केले.
लहानपणापासूनच सैन्य दलाची आवड असलेल्या तनयावर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सैनिकी प्रदर्शनांचा प्रभाव पडला. देशभक्तीची भावना मनात रुजवत तिने सतत प्रयत्न केले आणि अखेर यश संपादन केले.
मुंबईतील निवासस्थानी शिवापुर गडकरी ग्रामस्थ मंडळ (रजि.) मुंबईचे संस्थापक अध्यक्ष शरद दाजी शिंदे, माजी सभापती मोहन सावंत तसेच ग्रामस्थांनी भेट देऊन तिचे अभिनंदन केले. तनयाच्या या यशामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात मानाचा नवा तुरा रोवला गेला आहे.