कणकवली ( मयुर ठाकूर ) : राज्य शासनाने दिव्यांग लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये एक हजार रुपयांची वाढ केली आहे. यामुळे दिव्यांग लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यापासून अडीच हजार रुपये अर्थसहाय्य दिले जाणार आहे. याचा लाभ दिव्यांग बांधवांना होणार आहे. आर्थिक अडचण सोडवण्यास यामुळे मदत देखील होणार आहे. राज्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
दिव्यांग लाभार्थ्यांना पूर्वी दीड हजार रुपये मिळत होते. आता या निर्णयामुळे अडीच हजारांचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी राज्य शासनाने ५७० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सदरचा निर्णय घेण्यात आला आहे.
योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
या योजनेसाठी दिव्यांगांना ४० टक्केपेक्षा अधिक अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. सोबतच ५० हजारांच्या आत उत्पन्नाचा दाखला असावा लागतो. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांनी स्वयंघोषणापत्र द्यावे. या शिवाय सक्षम व्यक्ती घरात असतील तर त्या पोसण्यासाठी तयार नाही, असे अॅफेडेव्हिट सादर करावे लागते.
कोणाकोणाला मिळणार लाभ ?
राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगांतील सर्व प्रवर्ग, निराधार, विधवा, आदींना दरमहा १५०० रुपये अर्थसहाय्य दिले जाते. यातील दिव्यांग बांधवांना वाढीव अर्थसहाय्य सप्टेंबरपासून लागू केले आहे. ऑक्टोबर महिन्यात याची अंमलबजावणी होणार आहे.
दिव्यांग योजनेचा लाभ घेताना लाभार्थी १८ वर्षांच्या आतील लाभार्थी असेल तर अशा पाल्यांना पालकांच्या माध्यमातून लाभ दिला जातो. पालकांच्या खात्यात ही रक्कम वळती केली जाते.
अर्ज कुठे, कसा करायचा?
या योजनेसाठी दिव्यांग बांधवांनी तहसील कार्यालयात अर्ज दाखल करावा. संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात अर्ज दाखल करायचा आहे. सेतू केंद्रातून ऑनलाइन स्वरूपात हा अर्ज दाखल करावा लागतो. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील पाच लाख दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मिळणार लाभ
जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. जिल्ह्यात दिव्यांग लाभार्थ्यांची संख्या साडेचार हजारांच्या घरात आहे. या सर्व लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे.