एलसीबीची देवगडात कारवाई
सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
देवगड : देवगड – कुणकेश्वर रस्त्यावर गांजाची देवाण-घेवाण करताना चार संशयितांना स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने रंगेहाथ पकडले. रात्री १२.०५ वाजण्याच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यात गांजा सह दुचाकी असा सुमारे २ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांवर एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, विल्सन डिसोझा, प्रकाश कदम, आशिष कदम, महेश्वर समजीस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली. देवगड परिसरात गांजाची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागास मिळाली होती. त्यानुसार या पथकाने सापळा रचला होता. यात देवगड कुणकेश्वर ब्राह्मणदेव मंदिर येथील रस्त्यावर रात्री १२.०५ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकींवर चार व्यक्ती थांबल्या असल्याचे त्यांना दिसून आले. पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांनी त्यांना हटकले. ते पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलिसांनी मिलिंद महादेव कुबल (वय-५६) रा. आनंदवाडी-देवगड, मनोज वसंत जाधव (वय-५०) रा. देवगड किल्ला-देवगड, सिद्धेश अनिरुद्ध मयेकर (वय-२५) रा. तारकर्ली काळेथर-मालवण, गौरव विनोद पाटकर (वय-२२) रा. वायरी आडवण या चार संशयितांना पकडण्यात आले. गांजाची देवाण घेवाण करताना ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे गांजा सापडून आला. संशयितांकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी हा गांजा मालवणमधील सिद्धेश मयेकर, गौरव पाटकर यांना देण्यासाठी आणल्याचे मिलिंद कुबल याने सांगितले. पोलिसांनी या संशयितांकडून ३ हजार रुपये किंमतीचा ९५ ग्राम गांजा, ७० हजार रुपये किंमतीची दुचाकी असा सुमारे २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयितांवर एन. डी. पी. एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवगड पोलीसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.