अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले
तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू धंद्याना लगाम घालण्यासाठी पोलीस सतर्क
कणकवली : तालुक्यात पोलिसांकडून अवैध दारू विक्रीवर धाडसत्र सुरू आहे. मागील काही दिवसांमध्ये कणकवली पोलिसांनी तालुक्यात विविध ठिकाणी गोवा बनावटीच्या दारू विक्रीवर छापा टाकला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास एलसीबीच्या पोलिसांनी नांदगाव येथील ब्रिजखाली गोवा बनवटीच्या दारूविक्रीवर कारवाई केलेली असतानाच रविवारी सायंकाळी ७.४५ वा. सुमारास कणकवली पोलिसांनीही नांदगाव – वाशिमवाडी येथे गोवा बनवटीच्या दारू विक्रीवर छापा टाकला. तेथे ३ हजार ८०० रुपयांची दारू जप्त करतानाच संशयित महेश मारुती मोरये (३२, रा. नांदगाव – वाशिमवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. कारवाईत कणकवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकणे, हवालदार चंद्रकांत झोरे, पांडूरंग पांढरे, महिला हवालदार स्मिता माने, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव आदी सहभागी झाले होते.