प्रवासी झाले ओले चिंब
रेल्वे प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी
सावंतवाडी : ऐन गणेशोत्सवाच्या गर्दीत प्रवाशांची गैरसोय वाढवत, कोकण रेल्वेची कोकणकन्या एक्सप्रेस आज दोन तास उशिराने सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचली. यामुळे शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान रेल्वे स्थानकावरील बांधकाम अजूनही अपूर्ण आहे. प्रवाशांसाठी पुरेशा शेड्सची सोय नसल्याने, पावसात अनेक प्रवाशांना ओलेचिंब होत उभे राहावे लागले. उष्णता आणि पाऊस या दोन्हीमुळे महिला, लहान मुले, आणि वृद्ध प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात प्रवाशांची मोठी गर्दी असते. अशावेळी गाड्यांचा विलंब आणि स्थानकावरील अपुऱ्या सुविधांमुळे प्रवाशांचा त्रास दुप्पट झाला आहे. प्रवाशांनी याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून, कोकण रेल्वे प्रशासनाने तातडीने स्थानकावरील सुविधा पूर्ण कराव्यात आणि गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.