18.4 C
New York
Saturday, August 30, 2025

Buy now

जिल्हा परिषदेतील ४३४ आरोग्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू – रवींद्र खेबुडकर

कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा समावेश

फरकाची रक्कम सुध्दा मिळणार

ओरोस : आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दुरुस्त करणाऱ्या समितीने दिलेल्या अहवालाची शासनाने अंमलबजावणी केली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त ४३४ कर्मचाऱ्यांना गणपती पावला असून त्यांना याचा फायदा झाला आहे. या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली असून सातवा वेतन आयोग लागू झाल्या पासूनची फरक रक्कम सुध्दा मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली. याबाबत माहिती देण्यासाठी श्री. खेबुडकर यांनी आज सायंकाळी आपल्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. शासनाने कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. परंतु आरोग्य विभागातील आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सेवक पुरुष व महिला यांना याचा फायदा झाला नव्हता. त्यांची वेतनश्रेणी सुधारली नव्हती. त्यामुळे या कर्मचारी संघटनेने वेतनश्रेणी सुधारण्याची मागणी केली होती. त्यानुसार यातील त्रुटी काढण्यासाठी शासनाने समिती नियुक्त केली होती. त्या समितीने याबाबत सादर केलेल्या अहवालानुसार शासनाने यात सुधारणा करून आदेश काढला आहे. त्या प्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक पुरुष, आरोग्य सेवक पुरुष व महिला यांच्या वेतनश्रेणी मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा समावेश आहे. यात आरोग्य पर्यवेक्षक संवर्गातील कार्यरत १६ आणि सेवानिवृत्त १३ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोग्य सहाय्यक पुरुष गटात कार्यरत ५५ आणि सेवानिवृत्त १४ कर्मचारी, आरोग्य सेवक पुरुष गटात कार्यरत १३१ आणि सेवानिवृत्त १० तर आरोग्य सेवक महिला गटात कार्यरत ११२ आणि सेवानिवृत्त ८३ अशाप्रकारे कार्यरत ३१४ आणि सेवानिवृत्त १२० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे यावेळी खेबुडकर यांनी सांगितले. याच बरोबर जिल्हा परिषदेतील सर्व संवर्गातील पदोन्नती पूर्ण करण्यात आल्याचेही खेबुडकर यांनी सांगितले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!