कणकवली : गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे – गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती समजताच वागदे सरपंच संदीप सावंत व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी पाहणी केली असता विश्वनाथ हे जागीच मृत्युमुखी पडले होते. अपघाताची माहिती समजताच कणकवली पोलीसही घटनास्थळी दाखल झाले होते. विशेष म्हणजे विशवनाथ यांना ठोकर देणारी कार महामार्गाच्या बरीचशी डाव्या बाजूला आली होती, असे ग्रामस्थांचे म्हणणे होते. विश्वनाथ मोलमजुरी करायचे. त्यांच्या अपघाती मृत्यूने वागदे गावावर शोककळा पसरली आहे.