बेळगाव येथून एक संशयित ताब्यात
सावंतवाडी पोलिसांची कारवाई
सावंतवाडी : येथील उपरलकर देवस्थानसमोरून चोरट्यांनी पळवलेली मोटारसायकल आंबोली चेक पोस्ट येथील पोलिसांनी अवघ्या २४ तासांत हस्तगत केली आहे. या प्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. सुनील सदाशिव पठाण (वय २६, रा. वड्राळ, ता. चिकोडी, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे श. उद्या त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोंदा येथील रहिवासी आणि सध्या बांदा येथे वास्तव्यास असलेले सीताराम पांडुरंग साळगावकर (वय ४३) यांची हिरो होंडा स्प्लेंडर ही मोटारसायकल काल, २६ ऑगस्टला दुपारी पावणेचारच्या सुमारास उपरलकर देवस्थानसमोरून चोरीला गेली होती. साळगावकर यांनी मोटारसायकलची चावी गाडीवरच ठेवून देवदर्शनासाठी गेले होते. परत आल्यावर गाडी जागेवर नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली. या माहितीवरून, आंबोली चेक पोस्ट येथे हवालदार गलोले, काळे, रामदास जाधव आणि पोलीस नाईक परब यांनी नाकाबंदी केली. यावेळी त्यांना एक संशयित व्यक्ती आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता, त्याचे नाव सुनील पठाण निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सरदार पाटील, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर आणि पोलीस नाईक परब यांच्या पथकाने चिकोडी, बेळगाव येथे जाऊन अधिक चौकशी केली. आज या पथकाने चोरीला गेलेली मोटारसायकल हस्तगत केली आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती साटम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कामगिरीमध्ये पीएसआय सरदार पाटील, पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर, संतोष गलोले, रामदास जाधव, दीपक शिंदे आणि पोलीस नाईक गौरव परब यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांनी २४ तासांच्या आत संशयिताला अटक करून चोरीस गेलेली मोटारसायकल परत मिळवली आहे.