तात्काळ मुक्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश
कणकवली : येथील एका प्रशालेतील अल्पवयीन विद्यार्थीनींना चेंजिंग रुममध्ये चोरून बघितल्याप्रकरणी शिक्षक आप्पाजी अरूण मोहिते यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता अतिरीक्त सत्र तथा विशेष न्यायाधिश व्ही. एस. देशमुख यांनी पोलिसांनी केलेली अटकेची कारवाई अवैध ठरवून तत्काळ मुक्त करण्याचे आदेश दिले. संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
१३ ऑगस्ट २०२५ रोजी खेळाची प्रॅक्टीस करण्यासाठी विद्यार्थीनी चेंजिंग रुममध्ये कपडे बदलत असताना एक इसम त्यांना चोरून बघत असल्याचे जाणवले. म्हणून त्यापैकी एका विद्यार्थीनीने पाहिले असता संशयित ग्रंथालयाकडे निघून गेला. त्यावेळी आरडाओरड झाली. म्हणून इतर वर्गातील दोन विद्यार्थीनीही धावत आल्या. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून भा.न्या.सं. कलम ७७, ७९ व पोस्को कायदा कलम ११ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच संशयिताला २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी अटक करण्यात आली.
मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले असता अटक करताना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न झाल्याने त्याला तात्काळ मुक्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.