कन्हैया पारकर, प्रसाद अंधारी यांच्या मध्यस्थीमुळे वादावर पडदा
कणकवली : बाजारपेठेत नगरपंचायत प्रशासनाकडून बुधवारी रात्री रस्त्यावर लाइनआऊट करण्यात आली. ही लाइनआऊट दुकाने व घरांच्या उंबऱ्यापर्यंत गेल्याने व्यापारी व नगरपंचायत अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये गुरुवारी वाद झाला. नगरपंचायत अभियंता यांनी या लाइनच्या आतमध्ये दुकाने लावावीत, असे व्यापाऱ्यांना सांगितले. त्यावरून नगरपंचायत अभियंता आणि व्यापारी यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. अखेर माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व प्रसाद अंधारी यांनी मध्यस्थी केल्याने या वादावर तूर्तास पडदा पडला.
गणेशोत्सव काळात शहरात वाहतूक कोंडी व खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुख्याधिकारी गौरी पाटील यांचा अध्यक्षतेखाली नगराध्यक्षांच्या दालनात पोलिस, व्यापारी, भाजी, फळ, फुले विक्रेत्यांची बैठक अलीकडेच झाली. बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये व गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय होऊ नये, याकरिता बाजारपेठेतील रस्त्यावर लाइनआऊट करून त्या लाइनबाहेर कोणीही अतिक्रमण करू नये, असा निर्णय झाला होता. याशिवाय नियमावलीही तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवारी रात्री नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेतील रस्त्यालगत लाइनआऊट केली. ही लाइनआऊट व्यापारी व बाजारातील घरांच्या उंबऱ्यापर्यंत केली गेली. याबाबत गुरुवारी सकाळी व्यापारी व घरमालकांनी नगरपंचायत अभियंता यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यावरून व्यापारी व त्यांच्यात वादंग झाला. गतवर्षी पेक्षा यंदा नगरपंचायतने रस्त्यापासून खूप आत लाइनआऊट केल्याची बाब अभियंता यांच्या निदर्शनास आणून दिली. यावरून व्यापारी व अभियंता नेरकर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. त्यामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
*वादावर अखेर पडदा*
तत्पूर्वी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी लाइनआऊट केलेल्या व अतिक्रमण केलेल्या व्यापाऱ्यांना साहित्य हटविण्यास भाग पाडले. त्यावरून वादंग झाला. अखेर याप्रश्नी माजी उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर व माजी नगरसेवक प्रसाद अंधारी यांनी व्यापारी व नगरपंचायत अभियंता यांच्यासोबत चर्चा केली. तसेच नगरपंचायतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे कन्हैया पारकर यांनी चर्चा केली. त्यानंतर नगरपंचायत अभियंता यांनी नरमाईची भमिका घेतल्याने या वादावर अखेर पडदा पडला.