साधारणपणे तीस ते चाळीस जण रडारवर ; सूत्रांची माहिती
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैध धंद्याना थारा नाही आणि अवैध धंदे करणाऱ्यांना देखील थारा नाही, असा इशारा पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी दिला होता. मात्र त्यानंतर कणकवली शहरातील बाजारपेठ मध्ये भर दुपारी ४ वा. च्या सुमारास महादेव रामकांत घेवारी यांच्या नेतृत्वाखाली सुरू आलेल्या मटका बुकीं वर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी थेट धाड टाकली होती. त्यानंतर पोलिसांना माहिती देऊन कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देखील दिल्या. याप्रकरणात एकूण बारा जणांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र याप्रकारची जोडली गेलेली पाळेमुळे शोधून काढण्याची प्रक्रिया सुरू असतानाच अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये साधारणपणे ३० ते ४० जण सहभागी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार पोलिसांची यंत्रणा कामाला लागली आहे. यामध्ये ‘त्या’ ३० ते ४० जणांमध्ये नेमके आहेत कोण ? याच्या चर्चा नाक्या – नाक्यावर रंगू लागल्या आहेत.
एकंदरीत पाहिलं तर पालकमंत्री नाम. नितेश राणे यांनी टाकलेल्या धाडी नंतर कणकवली शहरातील बऱ्याच ठिकाणचा मटका – जुगार बंद होता. त्याचप्रमाणे पोलिसांनी निलंबनाची धास्ती घेऊन अवैध धंद्यांवर कारवाई करण्यास सुरू केली असल्याचे चित्र आहे.
…अशांवर कारवाई होणार -सहाय्यक पो. निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत
कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्यानंतर कणकवली पोलीस ठाण्याच्या चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सावंत यांच्याकडे देण्यात आला आहे. यावेळी श्री. सावंत यांनी या कारवाईचा अनुषंगाने कडक पाऊले उचलली असून जिथे असे प्रकार सुरू असतील तेथे कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.