सिंधुदुर्ग: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थिती आणि हवामान खात्याने दिलेल्या ‘ऑरेंज अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, अंगणवाड्या आणि इतर शैक्षणिक संस्थांना उद्या, २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असून, अनेक नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि शासनाच्या परिपत्रकानुसार, स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत.
या आदेशानुसार, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, प्राथमिक, माध्यमिक, जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आणि आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांना ही सुट्टी लागू असणार आहे.
हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी आज रोजी या संदर्भात लेखी आदेश जारी केला आहे.