23.3 C
New York
Tuesday, August 19, 2025

Buy now

महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत : आ. निलेश राणे | कणकवली मतदारसंघातील पदाधिका-यांच्या नियुक्त्या जाहीर

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जातील याबाबतचा निर्णय शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार नारायण राणे घेतील. जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अभिप्रेत असलेली संघटनात्मक बांधणी केली जात आहे. त्यादृष्टीने कणकवली विधानसभा मतदारसंघात सहा पदाधिका-यांचा नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत, केवळ गैरसमज होते. गैरसमज महायुतीचे नारळी पौर्णिमा कार्यक्रम नारळ फोडून दूर झाल्याचे शिवसेना नेते तथा आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपनेते संजय आग्रे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, महिला आघाडी प्रमुख दीपलक्ष्मी पडते, उपजिल्हाप्रमुख दादा साईल आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीतील चर्चाबाबत काहीही शंका करण्याची गरज नाही. कणकवली विधानसभा मतदारसंघात कुवत नसलेल्या उबाठा उमेदवाराला 50 हजार मते मिळाली आहेत. ती मते का मिळाली? त्यामुळे या मतांवर काम करुन शिवसेना संघटना उभी केली जाईल. जनतेची महायुती सरकारच्या माध्यमातून कामे मार्गी लावली जातील. समाजसेवा आणि समाजकारण करताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदार संघनिहाय काम केले जाईल. मित्र पक्षाला कोणताही त्रास होणार नाही, याबाबत काळजी घेतली जाईल. संघटना जोमाने उभी करण्यासाठी या पदाधिका-यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे, असे राणे यांनी सांगितले.

वरिष्ठांच्या सुचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती. त्यानंतर पक्षाच्या धोरणानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी जिल्हाध्यक्षपदी संजू परब, कुडाळ व कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी दत्ता सामंत यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार संघटनात्मक बांधणी करण्यासाठी पदाधिका-यांची नियुक्ती करण्यात येत आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघातीलही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

त्यामध्ये कणकवली तालुकाप्रमुख दामोदर सावंत, खारेपाटण विभाग अध्यक्षपदी मंगेश गुरव, देवगड तालुकाप्रमुख अमोल लोके, विलास साळसकर, वैभववाडी तालुकाप्रमुख संभाजी रावराणे, कणकवली विधानसभा प्रमुख संदेश सावंत-पटेल आदी पदाधिका-यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख नीता गुरव, सरिता राऊत यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. लवकरच या तीनही तालुक्यांमध्ये उर्वरित पदाधिका-यांच्या नियुक्त्या केल्या जातील. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूकांपूर्वी मजबूत संघटना उभी केली जाईल, आ. राणे यांनी सांगितले. दरम्यान, यावेळी नवनिर्वाचित पदाधिका-यांना नियुक्ती पत्र व पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस आ. निलेश राणे यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!