बेळणे इथं झाला अपघात
ते दोन्ही युवक हुंबरट मुस्लिमवाडी येथील
कणकवली : नांदगावहून हुंबरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. बेळणे येथे रविवारी रात्री १०.३० वा. सुमारास झालेल्या या अपघातात दुचाकीवरील जैद मीर (१८) व शाहीद शेख (२०, दोन्ही रा. हुंबरट मुस्लिमवाडी) हे दोन्ही युवक जागीच ठार झाले. दोन्ही युवकांच्या अपघाती मृत्यूने हुंबरट परिसरावर शोककळा पसरली आहे.
जैद व शाहीद हे दोघे चायनिज आणण्यासाठी होंडा शाईन दुचाकी घेऊन नांदगांवला गेले होते. तेथून परतत असताना बेळणे येथे महामार्गानजीक उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक एवढी तीव्र होती की, दुचाकीच्या हँडलसह दर्शनी भागाचा चक्काचूर झाला. तर दोन्ही युवकांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दोन्ही युवकांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांचाही मृत्यू झाला होता.
अपघाताची माहिती समजताच हुंबरट परिसरातील ग्रामस्थांनी पहिले घटनास्थळी व नंतर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. दोघांच्या अपघाती मृत्यूने सर्वच शोकाकूल झाले होते.
दरम्यान कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून मयतांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले. त्यानुसार अपघाताची पोलिसांत नोंद करण्याची कार्यवाही सुरू आहे.