पक्ष शिस्तभंग केल्याचा ठपका
जिल्हाध्यक्षांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्षांकडून कारवाई
सावंतवाडी : भाजप सोडून जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या समवेत शिवसेनेत जाणाऱ्या तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व पक्षाच्या विरोधात भाष्य केल्याचा ठपका ठेवून कोलगाव येथील चार ग्रामपंचायत सदस्यांना पक्षातून ६ वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. रोहित नाईक, प्रणाली टिळवे, आशिका सावंत, संयोगिता उगवेकर अशी या चौघांची नावे आहेत. या बाबतची कारवाई जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आदेशावरून करण्यात आली आहे.
याबाबतची माहिती आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष संतोष राऊळ यांनी दिली. या चौघांनी नुकतीच संजू परब यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. महेश सारंग यांच्या एककल्ली धोरणाला आपण कंटाळल्याचा दावा केला होता. या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.