सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा लुटण्याचे काम काही लोकांकडून सुरू आहे. त्यामुळे महसूल मंत्र्यांनी काल जाहीर केल्याप्रमाणे वाळूमाफिया, जमिनीची दलाली आणि अवैध मायनिंग उत्खनन करणाऱ्या संबंधितांवर कारवाई केल्यास आम्ही त्यांचा जिल्ह्याच्या वतीने नागरी सत्कार करू, अशी भूमिका ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज येथे व्यक्त केली. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध लोह खनिज उत्खनन, जमीन गैरव्यवहार आणि वाळू चोरी यामागे नेमका कोण?याचा शोध घेण्यात यावा. या मागणीसाठी प्रसंगी आम्ही आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. श्री. पारकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसात जमीन घोटाळा अवैध लोह खनिज याबाबत लोकांच्या मोठ्या तक्रारी आहेत. मात्र वारंवार तक्रारी करून सुद्धा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी यात लक्ष घालत नाहीत. त्यामुळे यामागे नेमका कोणाचा हात आहे? याची माहिती उघड होणे गरजेचे आहे. सासोली येथे घडलेल्या जमीन घोटाळा प्रकरणात किंवा मठ-दाभोली येथे घडलेल्या जमीन हिसकावणी प्रकरणात आपण महसूल विभागाकडे लेखी तक्रार केली होती. मात्र तक्रार करून सुद्धा याबाबत कोणतीही भूमिका घेण्यात आलेली नाही. तसेच संबंधितावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. याचा अर्थ या प्रकारामागे भूमी अभिलेख, महसूल प्रशासन आहे का?, असा सवाल श्री. पारकर यांनी उपस्थित केला. गेल्या दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या जमीन व्यवहारात नेमके कोणा कोणाला जमिनी विकल्या?, कोणी जमिनी घेतल्या? याबाबतची श्वेतपत्रिका जिल्हा प्रशासनाकडून काढण्यात यावी, अशी मागणी आपण यापूर्वी केली होती. मात्र तसा कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र दुसरीकडे जमिनीतील गैरव्यवहार आणि अवैध मायनिंग उत्खनन सुरू आहे. साटेली तर्फ सातार्डा येथे सुरू असलेल्या बेकायदा मायनिंग उत्खनन आणि चोरट्या वाहतुकीच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. आपण या संदर्भात तक्रारी केल्या होत्या. मात्र प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे कौतुक केले. आम्ही ठाकरे शिवसेना म्हणून काल हुमरस येथे रस्त्याच्या संदर्भात आंदोलन करत असताना आम्हाला त्यांनी बोलवून घेतले आणि आमचे म्हणणे ऐकून घेतले. एक सत्ताधारी पक्षाचा नेता असताना सुद्धा त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे त्यांनी काल जिल्ह्यात येऊन जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यातील अवैध मायनिंग उत्खनन तसेच वाळूमाफिया आणि जमिनीच्या दलालीत जे कोणी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. तसे त्यांनी केल्यास आम्ही त्यांचा जिल्हा वासियांच्या माध्यमातून जाहीर नागरी सत्कार करू, असे पारकर म्हणाले