सुदैवाने कोणीही जखमी नाही
बांदा चेकपोस्ट समोरच अपघात, चर्चेला उधाण
बांदा : दारू वाहतूक करणाऱ्या क्रेटा कारने रस्त्यावर थांबलेल्या ओमनीला धडक दिल्याने दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास बांदा चेक पोस्ट समोरच घडली. अपघातानंतर क्रेटा मधील चालक फरार झाला आहे. पोलीस दाखल झाले असून आत मध्ये असलेली दारू जप्त करण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार पोलीस चेकपोस्टच्या समोरच घडल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, सावंतवाडीच्या दिशेन दारू घेऊन जाणाऱ्या भरधाव वेगाने जाणाऱ्या क्रेटा कारने रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या ओमनी कारला धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संबंधित दारू वाहतूक करणारा चालक ही जखमी झाल्याचे समजते.दरम्यान आपण अडचणीत येऊ नये म्हणून चालकाने त्या ठिकाणाहून पळ काढला. अपघात झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील स्थानिकांनी गाडीच्या ठिकाणी धाव घेतली. मात्र गाडीत मोठ्या प्रमाणात दारू असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे व सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. त्या ठिकाणी गाडीतील दारू व गाडी जप्त करण्याची कारवाई सुरू आहे.