बांदा : पाडलोस येथील श्री देव रवळनाथ मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने महिनाभर चालणारा हरिनाम उत्सव मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे. दररोज रात्री मंदिरात ग्रामस्थ एकत्र येऊन भजन, कीर्तन व नामस्मरण करतात. श्रावण महिन्यातील या हरिनाम उत्सवाची गावात विशेष परंपरा असून, या माध्यमातून एकोपा, श्रद्धा व भक्तीची जोपासना केली जाते. मंदिरातील देवतेच्या मूर्तीसमोर भक्तिमय वातावरण निर्माण होते. गावातील लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा यात सक्रिय सहभाग असतो. हरिनामाच्या गजरात संपूर्ण पाडलोस गाव भक्तिरसात न्हाऊन निघत असून, या परंपरेला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. श्रावणातील हा उत्सव गावाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानला जातो.